बटेर पक्षी (Quail)

बटेर पक्षी (Quail)

वाढती बेरोजगारी, नोकरीतील अनिश्चितता यामुळे युवकांसमोर संकट उभे ठाकले आहे. आपली शेती निसर्गावरच अवलंबून असल्याने शेतीलाही निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका बसत आहे.यासाठी शेतकरी, बेरोजगार युवक-युवतींना शेतीपूरक उद्योगातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.


या दृष्टीने कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन आदी उद्योग उभारी घेत आहेत. या सोबतच कमी जागेतील, कमी खर्चातील चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून लेव्ही (बटेर) पालन बेरोजगारांना उत्तम संधी निर्माण करून देत आहे. अतिशय रुचकर मांस व अंडी उत्पादनामुळे मार्केटमध्ये लेव्हीची मागणी वाढत आहे.


जगामध्ये बटेरचा आहारामध्ये वापर चिकनपूर्वीही सुरू झाल्याचे समजते. चीन, तैवान यूके इत्यादी देशांमध्ये फार वर्षापासून बटेर पालन केले जात होते. ५०च्या शतकात इटली देशामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून बटेर पालनास सुरुवात झाली. भारतात प्रथमत: मध्यवर्ती कुक्कुट संशोधन संस्था इज्जतनगर या अग्रणी केंद्रामध्ये अमेरिकेतून बटेर आणण्यात आले व १९७२ सालापासून त्यावर महत्त्वाचे संशोधन सुरू झाले. यामध्ये ए.व्ही.एम. हॅचर कोईंबतूर यांचाही मोलाचा वाटा होता.


जापनीज बटेर ही आपल्याकडे जंगलात आढळणारी लाव्ही या सारखीच प्रजाती आहे. परंतु ही आकाराने मोठी जात आहे. प्रतिकूल हवामानामध्ये हे पक्षी चांगल्या प्रकारे तग धरतात. मांस स्वादिष्ट व चवदार असल्याने याला मागणी चांगली आहे. एकूण शरीराच्या १० टक्के हाडे, १४ टक्के त्वचा व ७६ टक्के मांसल भाग असतो. हाडे पापुद्रयासारखी असतात. मांसामध्ये उच्च प्रकारची प्रथिने (अमिनो आम्ले) जीवनसत्त्वे असतात. यात कोलेस्टेरॉल कमी (२.५ टक्के) असते. हे मांस लहान मुले, गर्भवती स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त समजले जाते.


३ आठवडयानंतर नर आणि मादी यातील फरक लक्षात येतो. नराच्या मानेखाली लालसर भुरा व धूसर रंग आढळतो. तर मादीच्या मानेखाली पोटावर सुरमयी पिवळसर छटा असून त्यावर काळया रंगाचे ठिपके आढळतात. मादीचे वजन नरापेक्षा १५ ते २० टक्के अधिक असते.


बटेर व्यवस्थापन


सर्वसाधारणपणे १ ते ४ आठवडेपर्यंत बटेर पक्षांना कृत्रिम दायीद्वारे उष्णता द्यावी लागते. १ दिवसाचा बटेर ६ ते ७ ग्रॅम वजनाचा असतो. पिल्ले येण्यापूर्व ब्रुडिंगशेडचा भाग, पाण्याची भांडी जमिनीवर पसरविण्यात येणारा भुसा र्निजतुकीकरण करून घ्यावा लागतो. पिल्ले १ आठवडे वयाची असेपर्यंत त्यांना खूप जपावे लागते. कोंबडीच्या तुलनेत एका कोंबडीच्या जागेत ८ ते १० बटेर ठेवता येतात.


ब्रुडिंग अवस्थेत साधारण १०० वॅटचा बल्ब १ चौ. मी. जागेत उष्णता देण्यासाठी आवश्यक आहे. सतत २४ तास ४ आठवडे उष्णता देणे गरजेचे आहे. पहिले ३ आठवडे प्रतिपक्षी ८० चौ. से. मी. तर ४ ते ५ आठवडय़ांसाठी १२० चौ. से. मी. जागा आवश्यक असते.


सर्वसाधारणपणे ६ आठवडे वयापर्यंत १ पक्षी ५४६ ग्रॅम खाद्य खातो. मादी वर्षामध्ये २८० अंडी देते. एका अंडयाचे वजन साधारण १२ ग्रॅम एवढे असते. अंडी घातल्यापासून ४ दिवसांचीच अंडी उबवणुकीसाठी वापरावी असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण त्यातून पिल्ले मिळण्याचे प्रमाण चांगले असते.


बटेर स्वत: अंडी उबवत नाही. त्यामुळे गावठी कोंबडीखाली अंडी उबवली जावू शकतात किंवा मशीनद्वारे ती उबवली जाऊ शकतात. मध्यवर्ती कुक्कुट विकास केंद्राच्या संशोधनानुसार कॅरीउत्तम व कॅरीउज्ज्वल या मांसासाठी उत्तम जाती असल्याचे समजले जाते. राखाडी रंगाचे कॅरीउत्तमचे ४ आठवडयाचे वजन १५० ग्रॅम तर पाच आठवडेचे वजन १७०-१८० ग्रॅम;


२) पोटावर पांढरा पट्टा असलेल्या कॅरीउज्ज्वलचे चौथ्या ते पाचव्या आठवडयापर्यंत १४० ते १७५ ग्रॅम वजन असते. अन्य पांढ-या रंगाचे बटेर व पांढ-या कवचाची अंडी देणारे बटेर अशा जाती आढळतात. या जातीचे अंडी उत्पादन वर्षाला २८५ ते २९५ एवढे आहे. ही अंडय़ांची जात म्हणूनच ओळखली जाते. इतर कोंबडी पालनापेक्षा बटेर पालन हे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे फायदेशीर ठरते. त्यांना कोणतीही लस द्यावी लागत नाही. एका वर्गात बटेरच्या ३ ते ४ बॅचेस वाढवता येतात.


अंडी उत्पादन ४५ दिवसात सुरू होते व एका मादीपासून २८० ते २९० अंडी मिळतात. ५० टक्के अंडी उत्पादन ८व्या आठवडयात मिळते. २६व्या आठवडयानंतर अंडी उत्पादनात घट होऊ लागते. बटेरची विष्ठा गायीच्या शेणाच्या (खतासाठी) तुलनेत ४ पट अधिक सकस असते. एका बटेरपासून अंदाजे ९ ते १० रु. फायदा मिळू शकतो. मात्र या बटेर पालनासाठी,विक्रीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्रशिक्षण सहयोगी परेश आंबरे यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकते.

Send a Message

An email will be sent to the owner